प्लासीची लढाई : बंगालचा नबाब सिराजउद्दौला व ईस्ट इंडिया कंपनी यांत दि. २३ जून १७५७ रोजी बंगालमधील हुगळी (भागीरथी) नदीकाठी प्लासी (पलास) या गावाजवळ झालेली ऐतिहासिक महत्त्वाची लढाई. इंग्रजांना बंगालमध्ये फ्रेंचांचे वर्चस्व नष्ट करून आपली सत्ता दृढमूल करावयाची होती. त्यात सिराजउद्दौला हा मोठा अडसर होता. म्हणून त्यांनी काहीतरी निमित्त शोधून सिराजउद्दौलावर हे युद्ध लादले.
सिराजउद्दौला (१० एप्रिल १७५६-२३ जून १७५७) हा अलीवर्दीखान याचा नातू (मुलीचा मुलगा) वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी तो बंगालचा (ओरिसा, बंगाल व बिहारचा सुभेदार) नबाब झाला. या सुमारास इंग्रजांनी कलकत्त्यातील फोर्ट सेंट विल्यम किल्ल्याची डागडुजी विनापरवाना सुरू केली, म्हणून त्याने कलकत्त्यावर स्वारी करून तो किल्ला काबीज केला. अंधारकोठडीची तथाकथित घटना याच वेळची. कलकत्त्यावर इंग्रजांचा पुन्हा हल्ला होईल याची सिराजला कल्पना नव्हती. रॉबर्ट क्लाइव्ह व ॲडमिरल चार्ल्स वॉट्सन यांनी तयारी करून कलकत्ता काबीज केले (२ जानेवारी १७५७). तेव्हा सिराजने ईस्ट इंडिया कंपनीबरोबर अलीनगर येथे शांततेचा तह केला (९ फेब्रुवारी १७५७). या तहानुसार सिराजने कंपनीला अनेक सवलती दिल्या. बंगालची शांतता भंग होईल असे कोणतेही वर्तन उभयपक्षांकडून होणार नाही, अशी महत्त्वाची अट या तहात होती. यानंतर काही दिवसांतच यूरोपमध्ये इंग्लंड व फ्रान्स यांत युद्ध सुरू झाले. सिराजची सहानुभूती फ्रेंचांकडे होती आणि गुप्तपणे त्यांची मदतही तो घेत असे त्यांच्या व्यापारी वखारींना सवलती देई. या गोष्टी इंग्रजांना माहीत होत्या. इंग्रजांना सिराजविरुद्ध युद्ध करण्यास हे निमित्त पुरेसे होते. शिवाय फ्रेंचांचे बंगालमधील वर्चस्व त्यांना नष्ट करावयाचे होते. म्हणून इंग्रजांनी अलीनगरचा तह धुडकावून फ्रेंचांचे चंद्रनगर हे ठाणे काबीज केले (२३ मार्च १७५७) आणि सिराजउद्दौलाविरूद्ध एक कारस्थान रचले. या कारस्थानाचा मुख्य सूत्रधार कलकत्ता कौन्सिलचा एक सभासद व सेनानी रॉबर्ट क्लाइव्ह होता. त्याने सिराजउद्दौलाचा सरसेनापती मीर जाफर यास बंगालचा नबाब बनविण्याचे अभिवचन दिले. त्याबद्दल त्याच्याकडून काही रक्कम स्वतःस व काही कंपनीस घेण्याचे ठरले. शिवाय राय दुर्लभराम व मीर मादन या दुसऱ्या सेनापतींनाही फितूर करण्याचा प्रयत्न झाला. कंपनीने सिराजकडे तीन मागण्या केल्या :
१. फ्रेंच हे आमचे शत्रू आहेत, त्यांचा निःपात करण्यास मदत करावी.
२.फ्रेंचांच्या वखारी बंद कराव्यात
३. फ्रेंच सेनापती झां लॉ व त्याचे कासिमबझार येथील सैनिक आमच्या ताब्यात द्यावेत.
सिराजला फ्रेंचांच्या बाबतीत कोणतेच निश्चित धोरण ठरविता येईना आणि इंग्रजांना तो अखेरपर्यंत संदिग्ध उत्तरे देत राहिला. तेव्हा दोन्हींकडून युद्धाची तयारी होऊ लागली. सिराजला कटाची कल्पना होती पण ऐनवेळी आपले लोक दगा देतील यावर त्याचा विश्वास नव्हता. काही दिवस सरसेनापतिपदावरून दूर केलेल्या मीर जाफरलाच पुन्हा सर्व सैन्याचे नेतृत्व त्याने दिले. दोन्ही सैन्यांची गाठ प्लासीजवळ उत्तरेस पडली. इंग्रजांच्या बाजूने ३,००० सैनिक व आठ तोफा होत्या आणि नेतृत्व क्लाइव्हकडे होते. शिवाय सर आयर कुट वगैरे काही चांगले लढवय्ये होते, तर सिराजउद्दौलाकडे ६०,००० सैन्य, ५३ मोठ्या तोफा आणि सेंट फ्रेअसच्या हाताखाली फ्रेंचांचा तोफखाना होता. सैन्याचे नेतृत्व मीर जाफरकडे होते. क्लाइव्हने १९ जून रोजी काटवाचा किल्ला घेऊन मुर्शिदाबादकडे कूच केली पुढे लष्करी मंडळाचा निर्णय धुडकावून २१ जून रोजीच तो पूर आलेली भागीरथी पार करून प्लासीकडे गेला. २२ जून रोजी तो आपल्या सैन्यासह प्लासीजवळच्या आंबराईत तळ ठोकून होता. दुसरे दिवशी युद्धास प्रारंभ झाला. मीर मादन हा केवळ एकच निष्ठावान सेनापती सिराजच्या बाजूने विश्वासाने लढला पण तो मारला गेला. मीर जाफर लढत नाही, याची खात्री झाल्यावर क्लाइव्हच्या सर्व सैन्याचे चढाई केली. सकाळी सुरू झालेली ही चकमक कशीबशी दुपारपर्यंत संपली. आपले सैन्य फितूर झालेले पाहून सिराजउद्दौला रणांगणांतून पळून गेला. त्याला पकडून ठार करण्यात आले. इंग्रजांचे फक्त ६५ सैनिक मारले गेले. क्लाइव्हचे नेतृत्व व डावपेच यांमुळे या लढाईत यश मिळाले.
विजयी इंग्रजांनी मीर जाफरला घेऊन मुर्शिदाबाद ही सिराजची राजधानी जिंकली आणि मीर जाफरला नबाब केले. क्लाइव्हने स्वतःस बक्षीस म्हणून मोठी रक्कम घेतली आणि काही आपल्या सहकाऱ्यांना दिली. या विजयामुळे पुढे क्लाइव्हला काही उच्च पदे बंगालचे गव्हर्नरपद व सरदारकी मिळाली. त्यामुळे नबाबाचा खजिना रिकामा झाला आणि तो पूर्णतः ईस्ट इंडिया कंपनीवर अवलंबून राहिला. त्यामुळे साहजिकच इंग्रज बंगालचे अप्रत्यक्ष रीत्या राज्यकर्ते बनले. पुढे फ्रेंचांबरोबरच्या युद्धात (कर्नाटक) त्यांना या वेळची बरीच साधनसामग्री उपयोगी पडली. बंगालमधील फ्रेंचांचे वर्चस्व कमी झाले आणि ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता तिथे दृढतर झाली. यांतून पुढे भारतभर इंग्रजांना आपल्या सत्तेचा विस्तार करणे सोपे झाले.
No comments:
Post a Comment