Thursday, December 15, 2022

जावळीचे चंद्रराव मोरे

जावळी प्रांतात चंद्रराव हे जो गादी वर बसेल त्याचे पद होते. जावळी प्रांतातील आठवा वंशज समजला जाणारा दौलतराव हा निपुत्रिक होता. सन १६४७ साली दौलतराव मोरे निपुत्रिक वारला, म्हणून त्याची आई माणकाई हिने कृष्णाजी बाजी म्हणजेच चंद्रराव मोरे याला दत्तक घेतले. या दत्तक प्रकरणा दरम्यान काही कारणास्तव आदिलशाहीकडून मदत न घेता माणकाईने शिवाजी महाराजांना मदतीसाठी बोलावले. आता नवा 'चंद्रराव' नेमण्याचा अधिकार आदिलशाहीचा. परंतु, दौलतरावाची आई माणकाईने परस्परच शिवथरच्या यशवंतराव मोरेच्या वंशातील कृष्णाजी बाजीला दत्तक घेतले व त्याची चंद्रराव पदावर स्थापना केली.

मोरे घराण्यातील काहींचा याला विरोध होता. माणकाईने शिवाजीराजांकडे सहकार्य मागितले. राजांनी कृष्णाजी बाजीच्या चंद्रराव पदाला आपला पाठिंबा दिला. शिवाजीराजे व कृष्णाजी बाजी यांच्याविरुद्ध विजापूर दरबारात तक्रारी गुदरल्या गेल्या. परंतु फत्तेखानाचा पराभव, दिल्ल्लीचे समकालीन राजकारण, शहाजीराजेंची अटक व सुटका या सर्वांमुळे जावळी प्रकरणात आदिलशहाने लक्ष घातले नाही.

सन १६४९ साली अफजलखानाची वाईचा सुभेदार म्हणून नेमणूक झाली. जावळी भाग हा वाई प्रांतात येतो. अफजलखानाने नव्या चंद्ररावाची नेमणूक गैर ठरवली. आणि कान्होजी जेधे यांना जावळीवर हल्ला करण्याचा हुकूम दिला. परंतु जावळीवर चालून जावे तर शिवाजीमहाराजांनी जमविलेले राजकारण विस्कटले जाईल आणि हल्ला नाही करावा तर विजापूर दरबारी आपली निष्ठा नाही हे अफजलखानाला समजेल अशा दुहेरी कात्रीत सापडले. कान्होजींनी शिवाजी महाराजांना सल्ला विचारला. महाराजांनी कान्होजींना खानाशी बोलणे करण्याचा सल्ला दिला. कान्हाजींनी आपले विश्वासु आबाजीपंतांना खानाकडे पाठविले व आपल्या अटी कळविल्या. या वाटाघाटी बराच काळ चालू राहिल्या. त्याकाळात दक्षिणेत छोट्या छोट्या राजांनी पुन्हा उठाव चालू केले. परिणामी आदिलशहाने अफजलखानाला वाईहून परत बोलविले आणि कर्नाटकात मोहिमेवर पाठविले.

सन १६४९ च्या काही दिवस आधी चंद्ररावचा चुलत भाऊ हनमंतरावने जोर खोरे आपल्या ताब्यात घेतले. हा भाग अफजलखानकडे असलेल्या वाई परगण्यातला होता.

हनमंतरावाकडून जोर खोरे घेण्यासाठी अफजलखानने केलेली चाल पुढे सरकली नाही. ह्यानंतर मोरे घराण्याच्या हलचालींमुळे शिवरायांच्या मुलुखातील प्रजेला उपसर्ग होऊ लागला. मोरे त्याचे शेजारीच असल्याने त्याचा काहीतरी बंदोबस्त करणे भाग होते.

इ.स. १६४७ मध्ये माणकाईने दत्तक घेतलेल्या चंद्ररावास शिवाजी महाराजांनी जावळीच्या गादीवर बसण्यात मदत केली होती, ते यासाठीच की या उपकारामुळे जावळीकर मोरे हे आपले मित्र होतील व हिंदवी स्वराज्य-संवर्धनात त्यांच्याकडून सहकार्य प्राप्त होईल. परंतु लवकरच चंद्ररावाने महाराजांशी उघड शत्रुत्व आरंभले. स्वराज्य संवर्धनामुळे नकळत मोऱ्यांच्या स्वतंत्र सत्तेला धोका उत्पन्न झाला. शिवाजी महाराजांसारखा महत्वाकांक्षी राजा शेजारी असल्याने एकतर चंद्ररावाला त्यांचे प्रभुत्व मान्य करावे लागणार किंवा आज ना उद्या त्या दोघांमध्ये वितुष्ट येणार हे उघडच होते.

माणकाईने जावळीच्या चंद्रराव पदावर बसण्यासाठी महाराजांची मदत घेतली, त्यामुळे त्याने आपल्या सांगण्याप्रमाणे वागावे अशी महाराजांची अपेक्षा असणे चूक नव्हते. परंतु तसे करण्यास चंद्रराव तयार नसल्याने महाराज व चंद्रराव यांच्यात वितुष्ट निर्माण झाले.

१६५६ नंतर जावळीचे प्रकरण पुन्हा रंगले. राजांनीच कृष्णाजी मोरेची चंद्रराव पदावर स्थापना केली होती व अफजलखान जेव्हा हि व्यवस्था मोडू लागला तेव्हा राजकारण करून त्यांनी या चंद्ररावाला वाचविले होते. परंतु काही काळाने तो हे सर्व विसरला आणि उन्मत्त झाला. महाराजांचे उपकार विसरून या चंद्ररावाने आदिलशाही निष्ठा जाहीर करून महाराजांना शह देण्यास आरंभ केला.

तो असा,

१) बिरवाडी टप्पाखालील काही गावांचा अधिकार बाजी पाटील व मालोजी पाटील यांच्याकडे होता परंतु चंद्ररावाने त्यांना हुसकून लावले.ती गावे स्वतः बळकावली. इ.स. १६५१-५२ मध्ये हे पाटील महाराजांकडे मदत मागण्यासाठी आले, महाराजांनी त्यांची वतनावर पूर्णस्थापना केली. चंद्रराव स्वाभावीकच चिडला असल्यास नवल नाही.

२) पुढे लवकरच स्वराज्यातील मुसेखोऱ्याचा गावकुळकर्णी 'रंगो त्रिमल वाकडे' याने एका विधवेशी सिंदळकीचा गुन्हा केला आणि शिवाजीराजे शासन करतील या भीतीने तो जावळीस आश्रयास आला. चंद्रराव मोरे याने त्यास आश्रय दिला आणि महाराजांची नाराजी स्वतःवर ओढावून घेतली.

३) चिखलीचा रामाजी वाडकर व चंद्रराव यांचे पूर्वीपासून वैर होते. या वैराचा परिपाक म्हणजे , चंद्ररावाने त्यास जीवे मारले. या रामाजीचा पुत्र लुमाजी प्राणभयाने रोहीडेखोऱ्यात आला. चंद्ररावाने तरी सुद्धा त्याचा पाठलाग सोडला नाही. स्वराज्य कक्षेत असणार्या रोहीडेखोऱ्यात घुसून त्याने लुमाजीला ठार केले.

४) अशाप्रकारे शक्तीप्रदर्शन करणाऱ्या चंद्ररावाने आता भेदनीतीचा अवलंब केला. गुंजणमावळात देशमुखी कोणाकडे यावरून शिंदे-चोरघे-शिलिमकर यांच्यात जुना वाद होता. शिलिमकरांनी यापूर्वी फतहखान मोहिमेत महाराजांना साथ दिली होती, त्यामुळे साहजिकच महाराजांनी त्यांचा पक्ष देशमुखीसाठी उचलून धरला. परंतु चंद्रराव हे शिलिमकरांचे मामा असल्याने, आपण देशमुखी घेऊ नये, असे सुचविले.

हे वृत्त समजताच महाराजांनी शिलिमकरांना ताबडतोब अभयपत्र पाठवून मनधरणी केली. एकीकडे शिलिमकरांना अभयपत्र पाठवले तर दुसरीकडे शिवाजी महाराजांनी चंद्ररावाला जरबेचे पत्र पाठवले.

त्यावर प्रतिक्रिया म्हणून 'येता जावली जाता गोवली' अशा शब्दात धमकीवजा उत्तर चंद्ररावाकडून मिळाले (मो.ब.), परंतु मोरे बखरीत आलेला हा पत्रसंवाद कालोकाल्पित वाटतो.

त्या पत्रात महाराज लिहितात;

"तुम्ही मुस्तफद राजे म्हणवितां. राजे आम्ही. आम्हास श्रीशंभूनें राज्य दिधलें आहे तर तुम्ही राजे न म्हणावें. आमचे नोकर होऊन आपला मुलुख खाऊन हामराहा चाकरी करावी. नाहीतर बदफैल करून बंद कराल, तर जावळी मारून तुम्हांस कैद करून ठेवुं."

उत्तरादाखल चंद्ररावाने महाराजांस लिहिले कि,

"तुम्ही काळ राजे जाहला. तुम्हांस राज्य कोणें दिधलें? मुस्तफद राजा आपले घरी म्हटलीयावरी कोण मानितो? येता जावली जाता गोवली. पुढे एक मनुष्य जिवंत जाणार नाही. तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला तर, उदईक याल तर आजच यावे - आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा श्रीमहाबळेश्वर. त्याचे कृपेने राज्य करितों. येथे उपाय कराल तर अपाय होईल. यश न घेता अपयशास पात्र होऊन जाल."

चंद्रराव मोऱ्याचे हे उर्मट उत्तर ऐकून महाराज परम संतप्त झाले. त्यांनी मोऱ्याला अखेरचे एक पत्र पाठविले. त्यात ते म्हणतात,

"जावली खाली करोन, राजे न म्हणोन, मोरचेल दूर करून, हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजुराची काही चाकरी करणे. इतकीयावर बदफैली केलीया मारले जाल."

या पत्रानेही चंद्ररावाचे डोळे उघडले नाहीत. स्वतःच्या बळाचा अतिरेकी अभिमान चंद्ररावाने महाराजांना पुन्हा डिवचून लिहिले,

"दारुगोळी महझूद आहे. काही बेजबाबास खुते घालून लिहिले ते कासियास ल्याहाविले? थोर समर्थ असो."

समोपचाराने जावळी प्रकरण प्रकरण मिटत नाही हे आता स्पष्ट झाले होते. त्यामुळे बळाचा वापर केल्याशिवाय गत्यंतर नव्हते. पण जावळीवर आक्रमण करणे तितके सोपे नव्हते. कारण विजापूरकर चंद्ररावाची पाठराखण करीत होता. वाईचा सुभा अफजलखानाकडे होता. शाहजीराजे सुद्धा नुकतेच अटकेतून मुक्त झाले होते. त्यामुळे अनुकूल संधीची वाट पाहणे भाग होते.

लवकरच अशी अनुकुलता महाराजांना लाभली. विजापूरकर आदिलशाह मरणासन्न झाला होता, त्यामुळे गादीसाठी विजापुरास अंतर्गत कलह सुरु झाले होते. अफझलखानही कर्नाटकात रवाना झाला होता, अशावेळी जावळीवर हल्ला केल्यास चंद्ररावाच्या मदतीला लगेच कोणीतरी धावून येईल ही शक्यता कमी होती. म्हणून जावळीवरील मोहिमेला सुरवात झाली, ती जोर खोऱ्यावरील हल्ल्याने.

जेधे शकावली नुसार-

"त्यावरी जाउलीवरी मोहीम केली. कान्होजी नाईक यांस व अवघ्या देशमुखांस जामावानसी बोलाविले. जांबलीस मोरे होते. ते जेध्यांनी आधीच पिटाळून लाविले होते. जांवलीस मोरे कोणी नव्हते. जोरामध्ये हनमंतभाऊ मोरे होते. त्यावरी राजश्री स्वामींनी (शिवाजी) रघुनाथ बल्लाळ सबनीस पुण्याहून स्वरांच्याजमावानसी पाठवले. त्यांनी हनमंतभाऊ यास मारून जोर घेतले, जाउली मात्र राहिली होती."

शिवरायांनी चंद्ररावला लिहीले होते की त्याने राजे ही पदवी वापरु नये व शिवरायांशी इमान राखावा. हा उल्लेख मोरे बखरीमधे सापडतो. ह्यावर चंद्ररावाच्या उत्तराने शिवरायांबरोबरचे संबंध धोक्यात आणले. त्यामुळे हे स्पष्ट होते की शिवरायांचे जावळीवरचे आक्रमण मुख्यतः राजकारणासाठीच होते. सभासद बखरीत शिवरायांच्या जावळी युद्धाचे कारण स्पष्ट होते ...

चंद्रराव मोरे यांस मारल्याविरहित राज्य साधत नाही ।

जावळीवर हल्ला

आदिलशहाच्या परवानगीशिवाय मानकाबाईने दत्तक घेतलेला कृष्णाजी(येसाजी) चंद्ररावपदी बसल्याने चंद्ररावाचे आदिलशहाशी संबंध बिघडलेले होते. त्यातच जानेवारी १६५६ मध्ये औरंगजेब कुतुबशाहीवर आक्रमण करण्यासाठी उतरला होता. त्यावेळी कुतुबशाहीच्या मदतीसाठी आदिलशाही सैन्य सरहद्दीवर गोळा झाले होते. त्यामुळे आदिलशहाकडून चंद्ररावाला कोणतीही मदत मिळण्याची शक्यताच नव्हती. याचा फायदा घेऊन महाराजांनी तीच वेळ जावळीवर स्वारी करण्यासाठी निवडली. सामोपचाराने जावळी प्रकरण मिटत नाही हे स्पष्ट झाले. त्यामुळे बळाचा वापर केल्याशिवाय गत्यंतर नव्हते. रघुनाथ बल्लाळ सबनीस, संभाजी कावजी कोंढाळकर, सूर्यराव काकडे, कान्होजी नाईक जेधे, बांदल देशमुख व स्वतः महाराज एवढे सर्व या मोहिमेवर जाण्याचे ठरले. चंद्ररावाचे प्रमुख कारभारी व सैन्य जावळीच्या जोहोरबेट, चतुर्बेट, शिवथर खोरे, व खुद्द जावळी या ठिकानी विखुरलेले होते. या सर्व ठिकाणी अकस्मात हल्ला करून चंद्ररावाची जावळी काबीज करण्याचे ठरले. त्यानुसार संभाजी कावजी चतुर्बेटावर, रघुनाथ बल्लाळांनी जोहोरखोऱ्यावर तर काकडे, जेधे, बांदल व खुद्द महाराजांनी जावळीवर हल्ला केला. त्यात चंद्रराव मोरे यांना कैद करून नंतर रायगडावर ठेवण्यात आले. नंतर त्यांना मृत्यू दंडाची शिक्षा देण्यात आली. जावळी स्वराज्याचा एक प्रांत झाला होता.

जावळी - जयवल्ली :

जावळी म्हणजेच जयवल्ली, 'येता जावळी जाता गोवली' म्हणून मिरवली गेलेली. चंद्रराव उपाधी धारण करणाऱ्या मोर्यांची राजधानी. शिवरायांनी ज्यांचा बिमोड केला, जावळी जिंकून स्वराज्य विस्तार केला, अफझलखानाचा कोथळा काढला, आदिलशाही फौजेचा डंका वाजवला अशी ती जावळी. ..

एकबाजूला घनदाट झाडी, महाबळेश्वर , भोरप्या(आता प्रतापगड) रायगड सारखे अभेद्य जंगल आणि किल्ले कपारी आणि तिथूनच कोकणात उतरला तर थेट अरबी समुद्र अशी ही जावळी खोऱ्याची रचना आहे. सातारा जिल्ह्यात प्रतापगड सोडल्यावर महाबळेश्वरकडे जाताना साधारण ३-४ किमी डावीकडे जावळीच्या मोरे घराण्याचे कुळ आहे. हे जावळीचं बेलाग खोरं इतकं अवघड आणि अभेद्य की, १४ व्या शतकात ५००० मुसलमानी फौजा जावळीत गेल्या , त्या परतल्याच नाहीत आणि त्याचं काय झालं याचा ठाव ठिकाण देखील लागला नाही.अशी हि जावळी प्रत्यक्ष ताब्यात घ्यावी अशी कोणाची हिम्मत नव्हती. चंद्रराव हे विजापुरकरांचे (आदिलशहा) पिढीजात जहागीरदार होते.

जावळीच्या संस्थानची स्थापना करण्याऱ्या मूळ व्यक्तीचे नाव 'चंद्रराव' असे होते. या चंद्ररावला ६ मुले होती. त्यापैकी थोरल्या मुलाला त्याने स्वत:जवळ ठेवले आणि इतरांना जावळीतील निरनिराळ्या जागा नेमून दिल्या. थोरल्या शाखेत चंद्रारावापासून पुढील ८ पिढ्या झाल्या. चंद्रराव - चयाजी - भिकाजी - शोदाजी - येसाजी - गोंदाजी - बाळाजी - दौलतराव. जावळीचा हा प्रत्येक शाखापुरुष किताब म्हणून चंद्रराव हे नाव धारण करू लागला. चंद्रराव मोर्‍यांनी आठ पिढ्या खपून त्यांनी आपले वैभव एखाद्या सार्वभौम राजासारखे वाढविले होते . मोऱ्यांजवळ १०-१२ हजार फौज होती. महाडपासून महाबळेश्वर पर्यंतचा डोंगरी भाग व बव्हंश सातारा जिल्हा त्यांनी काबीज केला होता. या बाजूने कोकणात उतरणाऱ्या हातलोट व पार घाटातील माल वाहतुकीची जकात मोरे वसूल करीत. त्यांच्या अमलाखाली महाबळेश्वर, जावळी(कोयनेचे खोरे), वरंधघाट, पारघाट, शिवथर, रायगड इतका प्रांत होता.

बहामनी राज्याच्या उदयानंतर मराठे, पादशहाकडे नोकरी करून मनसबदारी मिळवुन राहू लागले. अश्या मराठ्यामध्ये चंद्रराव मोरे हा विजापुरी चाकरी करत होता. इथून पुढे बखरीत चंद्रराव मोरे यांची हकीकत सुरु होते.

चंद्रराव मोरेंची ओळखच चंद्रराव मोर्‍यांच्या बखरीचे बखरकार वाघाच्या शिकारीच्या प्रसंगातून करवून देतो. विजापूरच्या डोणप्रांती पातशहा शिकारीला गेला होता. शिकारीला एक वाघ कोणालाच दाद देत नव्हता. तेव्हा चंद्रराव मोरे वाघाला मारायला पुढे सरसावतात. या प्रसंगाचे वर्णन सुरेख केले आहे. वाघ समोर आल्यावर मोरे म्हणतात 'उठ कुत्र्या बसलास काय. तू आमचे एक कुत्रे आहेस !'. यातून बखरकाराने चंद्ररावच्या 'मर्द आदमी, आडेल शिपाई, आजदादेघरचा राउत मर्दाना ' या विशेषणातुन दर्शवलेली रग दिसते. शेवटी वाघासोबतच्या रणात मोऱ्यांचा विजय होतो. बादशाह चंद्ररावाना इनाम मागायला सांगतो. चंद्रराव मुऱ्हे प्रांतातली जावळी आणि राजे हा किताब मागतात. बादशाह मागितलेला इनाम देतो आणि सोबत हत्ती, घोडा, कडी, मोतियांची जोडी देतो.

पण चंद्रराव हुशार, इतक्यावर थांबत नाहीत. मोरे म्हणतात आता आम्ही राजे पण आमची भावकी, नातेवाईक आमच्या तोलामोलाचे नाही राहिले. आम्ही सोयरिक करायची तर कोणाकडे करावी. असे साधारण कारण पुढे करून बादशाह कडून आपल्या नातेवाईंकाना पदव्या, मानमरातब मागून घेतात. ते सर्व मान पुढीलप्रमाणे :

१२ जणांना 'राव' किताब :

पडेमकर, कुंभारखाणी सुर्वे, सडेकर शिंदे, पाकडे, महामुलकर, गणसावंत, खोपकर, हालमकर हंबीरराव, दलवीरराव, हंबीरराव, येरुणकर , घासेराव चव्हाणराव.

'राव' किताब आपल्या भाऊबंदाना :

देशकरराव, मुदोसकरराव, कलाकराव, हाटकेटकर, वीरमणकरराव, बिरवाडकर, आस्तनकर, मुधगावकर.

६ पुत्रांना खालील मरातबी :

प्रतापराव जोरामध्ये, हणमंतराव जावलीमध्ये, गोविंदराव महीपतगडी, चयाजीराव जावळी राज्यासनिध, शिवतरकर यसवंतराव यांना बादशाह कडून हिरवे निशाण...

या सर्व माराताबी आणि इनामे घेउन १२,००० सैन्यासहित चंद्रराव मोरे जावली वर चालून गेले. जावळी काबीज झाली. मोऱ्यानी तिथे राजगादी सुरु केली. पुढे हि गादी ८ पुरुषांकडून चालवली गेली असे संकेत लिहिलेत (प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष).

त्या ८ पुरुषांची नावे अशी : चयाजी राजे, भिकाजी राजे, शोदाजी राजे, येसाजी राजे, गोन्दाजी राजे, बाळाजी चंद्रराव राजे आणि दौलतराव राजे.

एकंदरीत अशा प्रकारे जावळीचे साम्राज्य, चंद्रराव मोरे यांचे महाराजा विरुद्ध कारस्थान असा इतिहास आहे.

 

 

No comments:

Post a Comment

यशवंतराव चव्हाण

पूर्ण नाव – यशवंतराव बळवंतराव चव्हाण जन्म- १२ मार्च,१९१३ देवराष्ट्रे जि.सांगली शिक्षण –टिळक हायस्कूल,कराड १९३८- बी.ए. इतिहास व राज्य...